।। श्री ।।
।। श्रीराम समर्थ ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा ।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचां ।।
नमू शारदा मूळ चत्वार वाचा ।
गमू पंथ आनंत या राघवाचा ।।१।।
मना सज्जना भक्ती पंथेची जावे ।
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे ।।
जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे ।
जनी वंद्य ते सर्व भावे करावे ।।२।।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।
पुढे वैखरी राम आधी वदावा ।।
सदाचार हा थोर सांडू नये तो ।
जनी तोचि तो मानवी धन्य होतो ।।३।।
मना वासना दृष्ट कामा नये रे ।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे ।।
मना सर्वथा निती सोडू नको हो ।
मना अंतरी सार विचार राहो ।।४।।
मना पाप संकल्प सोडूनि द्यावा ।
मना सत्यसंकल्प जीवी धरावा ।।
मना कल्पना ते नको विषयांची ।
विकारे घडे हो जनी सर्व ची ची ।।५।
नको रे मना क्रोध हा खेदकारी ।
नको रे मना काम नाना विकारी ।।
नको रे मना सर्वदा अंगिकारू ।
नको रे मना मत्सरु दंभ भारु ।।६।।
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे ।
मना बोलणे नीच सोशीत जावे ।।
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे ।
मना सर्व लोकांसी रे निववावे ।।७।।
देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी ।
मना सज्जना हेचि क्रिया धरावी ।।
मना चंदनाचे परी त्वा झीजावे ।
परी अंतरी सज्जना निववावे ।।८।।
नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे ।
अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे ।।
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे ।
न होता मनासारिखे दुःख मोठे ।।९।।
सदा सर्वदा प्रीती रामी धरावी ।
सुखाची स्वयें सांडी जीवी करावी ।।
देहे दुःख ते सुख मानीत जावे ।
विवेके सदा स्वरूपी भरावे ।।१०।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा