श्री मनाचे श्लोक ६१ ते ७०


।। श्री ।।

।। श्रीराम समर्थ ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।




।। श्री मनाचे श्लोक ६१ ते ७० ।।




उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे 
तया अंतरी सर्वदा तेचि राहे 
जनी सज्जनी वाद हा वाढवावा 
पुढे मागुता शोक जीवी धरावा ६१

निजध्यास तो सर्व तूटोनि गेला 
बळे अंतरी शोक संताप ठेला 
सुखानंद आनंद भेदे बुडाला 
मनी निश्चयो सर्व खेदे उडाला ६२

घरी कामधेनू पुढे ताक मागे 
हरीबोध सांडूनि वेवाद लागे 
करी सार चिंतामणी काचखंडे 
तया मागता देत आहे उदंडे ६३

अती मूढ त्या दृढ बुध्दी असेना 
अती काम त्या राम चित्ती वसेना 
अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा 
अती विषयी सर्वदा दैन्यवाणा ६४

नको दैन्यवाणे जिणे भक्तीऊणे 
अती मूर्ख त्या सर्वदा दुःख दूणे 
धरी रे मना आदरे प्रीति रामी 
नको वासना हेमधामी विरामी ६५

नव्हे सार संसार हा घोर आहे 
मना सज्जना सत्य शोधूनि पाहे 
जनी विष खाता पुढे सूख कैचे 
करी रे मना ध्यान या राघवाचे ६६

घनश्याम हा राम लावन्यरूपी 
महाधीर गंभीर पूर्णप्रतापी 
करी संकटी सेवकाचा कुढावा 
प्रभाते मनी राम चिंतीत जावा  ६७ 


बळे आगळा राम कोदंडधारी 
महा काळ विक्राळ तोही थरारी 
पुढे मानवा किंकरा कोण केवा 
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ६८

सुखानंदकारी निवारी भयाते 
जनी भक्तीभावे भजावे तयाते 
विवेकी त्यजावा अनाचार हेवा 
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ६९

सदा रामनामे वदा पूर्णकामे 
कदा बधिजेना पदा नित्यनेमे 
मदालस्य  हा सर्व सोडुनि द्यावा 
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ७०


।। जय जय रघुविर समर्थ ।।

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

श्री मनाचे श्लोक ५१ ते ६०


।। श्री ।।

।। श्रीराम समर्थ ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।




।। श्री मनाचे श्लोक ५१ ते ६० ।।


मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी 

प्रपंचीक नाही जयाते उपाधी 

सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा 

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा  ५१ 


क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे 

न लिंपे कदा दंभवादे विवादे 

करी सुखसंवाद जो ऊगमाचा 

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा  ५२ 


सदा आर्जवी प्रिय जो सर्वलोकी 

सदासर्वदा सत्यवादी विवेकी 

न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा 

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा  ५३ 


सदा सेवि आरण्य तारुण्यकाळी 

मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी 

चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा 

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा  ५४ 


नसे मानसी नष्ट आशा दुराशा 

वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा 

ऋणी देव हा भक्तीभावे जयाचा 

जगी धन्य तो दास सर्वोतमाचा  ५५ 


दिनाचा दयाळू मनाचा मवाळू 

स्नेहाळू कृपाळू जनी दासपाळू 

तया अंतरी क्रोध संताप कैचा 

जगी धन्य तो दास सर्वोतमाचा  ५६ 


जगी होईजे धन्य या रामनामे 

क्रिया भक्ती उपासना नित्यनेमे 

उदासीनता तत्वता सार आहे 

सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे  ५७ 


नको वासना विषयी वृत्तिरुपे 

पदार्थी जडे कामना पूर्वपापे 

सदा राम निष्काम चिंतित जावा 

मना कल्पनालेश तोही नसावा  ५८ 


मना कल्पना कल्पिता कल्पकोटी 

नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी 

मनी कामना राम नाही जयाला 

अती आदरे प्रीति नाही तयाला  ५९ 


मना राम कल्पतरू कामधेनू 

निधी सार चिंतामणी काय वानू 

जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता 

तया साम्यता कायसी कोण आता  ६० 



।। जय जय रघुवीर समर्थ ।।

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

श्री मनाचे श्लोक ४१ ते ५०


 ।। श्री ।।

।। श्रीराम समर्थ ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।


|| श्री मनाचे श्लोक ४१ ते ५० ||





बहु हिंडता सौख्य होणार नाही |
शिणावे परी नातुडे हीत काही ||
विचारे बरे अंतरा बोधवीजे |
मना सज्जना राघवी वस्ति कीजे || ४१ ||

बहुंतापरी हेचि आता धरावे |
रघूनायका आपुलेसे करावे ||
दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे |
मना सज्जना राघवी वस्ति कीजे  || ४२ ||

मना सज्जना एक जीवी धरावे |
जनी आपुले हीत तूवा करावे ||
रघूनायकावीन बोलो नको हो |
सदा मानसी तो निजध्यास राहो || ४३ ||

मना रे जनी मौनमुद्रा धरावी |
कथा आदरे राघवाची करावी ||
नसे राम ते धाम सोडूनि  द्यावे |
सुखलागि आरण्य सेवीत सजावें || ४४ ||

जयाचेनि संगे समाधान भंगे |
अहंता अकस्मात येऊनि लागे ||
तये संगतीची जनी कोण गोडी |
जिये संगतीने मती राम सोडी || ४५ ||

मना जे घडी राघवावीण गेली |
जनी आपुली ते तुवा हानी केली ||
रघूनायकावीण तो शीण आहे |
जनी दक्ष तो लक्ष लावूनि पाहे || ४६ ||

मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे |
जनी जाणता भक्त होउनि राहे ||
गुणी प्रीति राखे क्रमू साधनाचा |
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा || ४७ ||

सदा देवकाजी झिजे देह ज्याचा |
सदा रामनामे वदे नित्य वाचा ||
स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा |
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा || ४८ ||

सदा बोलण्यासारिखे चालताहे |     
अनेकी सदा एक देवसि पाहे |
सगुणी भजे लेश नाहीं भ्रमाचा ||
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा || ४९ ||


नसे अंतरी काम नानाविकारी  |
उदासीन जो तापसी ब्रह्मचारी ||     
निवाला मनी लेश नाहीं तमाचा | 
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचां || ५० ||


।। जय जय रघुवीर समर्थ ।।

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

श्री मनाचे श्लोक ३१ ते ४०


।। श्री ।।

।। श्रीराम समर्थ ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

।। श्री मनाचे श्लोक ३१ ते ४० ।।



 || जय जय रघुविर सम
र्थ ||



महासंकटी सोडिले देव जेणें  |

प्रतापे बळे आगळा सर्वगुणे  ||

जयाते स्मरे शैलेजा शूलपाणी  |

नुपेक्षी कदा राम दासभिमानी  || ३१ ||


अहिल्या शिळा राघवे मुक्त केली  |

पदी लागता दिव्य होउनि गेली  ||

जया वर्णिता शीणली वेदवाणी  |

नुपेक्षी कदा राम दासभिमानी   || ३२ ||


वसे मेरुमांदर हे सृष्टिलीला  |

शशी सूर्य तरांगणे मेघमाळा  ||

चिरंजीव केले जनी दास दोन्ही  |   

नुपेक्षी कदा राम दासभिमानी   || ३३ ||


उपेक्षा कदा रामरुपी असेना  |

जिवा मानवा निश्चयो तो वसेना  ||

शिरी भार वाहेन बोले पुराणी  |

नुपेक्षी कदा राम दासभिमानी   || ३४ ||


असे हो जया अंतरी भाव जैसा  |

वसे हो तया अंतरी देव तैसा  ||

अनन्यासि रक्षितसे चापपाणी  |

 नुपेक्षी कदा राम दासभिमानी   || ३५ ||


सदा सर्वदा देव सन्नीध आहे  |

कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे  ||

सुखानंद आनंद कैवल्यदानी  |

 नुपेक्षी कदा राम दासाभिमानी   || ३६ ||


सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा  |

उडी घालितो संकटी स्वामी तैसा  ||

हरीभक्तीचा घाव गाजे निशाणी  |

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी   || ३७ ||


मना प्रार्थना तूजला एक आहे |

रघूराज थक्कीत होउनि पाहे |

अवज्ञा कदा हो यदर्थी न किजे |

मना सज्जना राघवी वस्ति कीजे || ३८ ||


जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे | 

जयाचेनि योगे समाधान बाणे ||

तयालागि हे सर्व चांचल्य दीजे |

मना सज्जना राघवी वस्ति कीजे || ३९ ||


मना पाविजे सर्वही सूख जेथे |

अती आदरे ठेविजे लक्ष तेथे ||

विवेके कुडी कल्पना पालटीजे |

मना सज्जना राघवी वस्ति कीजे || ४० ||



।। जय जय रघुविर समर्थ ।।

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

श्री मनाचे श्लोक २१ ते ३०


||  श्री मनाचे श्लोक २१ ते ३० ||




|| जय जय रघुविर सम
र्थ ||




मना वासना चुकवी येरझारा |

मना कामना सांडी रे द्रव्यदारा ||

मना यातना थोर हे गर्भवासी |

मना सज्जना भेटवी राघवासीं || २१ ||


मना सज्जना हीत माझे करावे ||

रघुनायका दृढ चित्ती धरावे ||

महाराज तो स्वामी वायू सुताचा |

जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा || २२ ||


न बोलें मना राघवेवीण कांही |

जनी वाउगें बोलता सुख नाहीं ||

घडीने घडी काळ आयुष्य नेतो |

देहांती तुला कोण सोडूं पाहतो || २३ ||


रघुनायकाविण वायां शिणावे |

जनासारिखे व्यर्थ कां वोसंणावें ||

सदा सर्वदा नाम वाचे वसो दे |

अहंता मनी पापीणी ते नसो दे || २४ ||


मना वीट मानू नको बोलण्याचा |

पुढे मागुता राम जोडेल कैंचा ||

सुखाची घडी लोटतां सूख आहे |

पुढे सर्व जाईल कांही न राहे || २५ ||


देहे रक्षणे कारणे यत्न केला |

परी शेवटी काळ घेऊन गेला ||

करी रे मना भक्ति या राघवाची |

पुढे अंतरी सोडी चिंता भवाची || २६ ||


भवाच्या भये काय भितोस लंडी |

धरी रे मना धीर धाकास सांडी ||

रघुनायका सारिखा स्वामी शिरी |

नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी || २७ ||


दिनानाथ हा राम कोदंडधारी |

पुढे देखता काळ पोटी थरारी ||

मना वाक्य नेमस्त हे सत्य मानी |

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी || २८ ||


पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे |

बळे भक्तिरीपूशिरी कांबि वाजे ||

पुरी वाहिली सर्व जेने विमानी |

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी || २९ ||


समर्थाचिया सेवका वक्र पाहे |

असा सर्व भूमंडळी कोण आहे ||

जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही |

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी || ३० ||


|| जय जय रघुविर समर्थ ||



🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

श्री मनाचे श्लोक ११ ते २०

।। श्री ।।

।। श्रीराम समर्थ ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।



जनी सर्व सुखी असा कोण ।

आहे विचारे मना तुंचि शोधूनी पाहे ।।

मना त्वांची रे पूर्व संचित केले ।

तया सारिखे भोगणे प्राप्त झाले ।।११।।



मना मानसीं दुःख आणूं नको रे ।

मना सर्वथा शोक चिंता नको रे ।।

विवेके देहबुद्धी सोडूनी द्यावी ।

विदेहीपणें मुक्ती भोगीत जावी ।।१२।।



मना सांग पा रावणा काय झाले ।

अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले ।।

म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी ।

बळे लागला काळ हा पाठी लागी ।।१३।।


जिवा कर्मयोगे जनी जन्म जाला ।

परी शेवटी काळमुखी निमाला ।।

महाथोर ते मृत्यु पंथेची गेले ।

किती एक ते जन्मले आणि मेले ।।१४।।


मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी ।

जीता बोलती सर्वही जीव मी मी ।।

चिरंजीव हे सर्वही मानिताती ।

अकस्मात सांडूनीया सर्व जाती ।।१५।।


मरे एक त्याचा दुजा शोक वाहे ।

अकस्मात तोही पुढे जात आहे ।।

पुरेना जनी लोभ रे क्षोभ त्याते ।

म्हणुनी जनी मागुता जन्म घेते ।।१६।।


मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते ।

अकस्मात होणार होऊनी जाते ।।

घडें भोगणे सर्वही कर्मयोगे ।

मतिमंद ते खेद मानी वियोगें ।।१७।।


मना राघवेंवीण आशा नको रे ।

मना मानवाची नको कीर्ति तूं रे ।।

जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणें ।

तया वर्णिता सर्व ही श्र्लाघ्यवाणे ।।१८।।



मना सर्वथा सत्य सांडूं नको रे ।

मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे ।।

मना सत्य ते सत्य वाचे वदावे ।

मना मिथ्य ते मिथ्य सोडूनि द्यावें ।।१९।।



बहु हिंपुटी होईजे मायेपोटी ।

नको रे मना यातना तेचि मोठी ।।

निरोधे पचे कोंडिले गर्भवासी ।

अधोमुख रे दुःख त्या बाळकासीं ।।२०।।



।। जय जय रघुवीर समर्थ ।।

श्री मनाचे श्लोक १ ते १०

।। श्री ।।
।। श्रीराम समर्थ ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।






गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा ।

मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचां ।।

नमू शारदा मूळ चत्वार वाचा ।

गमू पंथ आनंत या राघवाचा ।।१।।


मना सज्जना भक्ती पंथेची जावे ।

तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे ।।

जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे ।

जनी वंद्य ते सर्व भावे करावे ।।२।।


प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।

पुढे वैखरी राम आधी वदावा ।।

सदाचार हा थोर सांडू नये तो ।

जनी तोचि तो मानवी धन्य होतो ।।३।।


मना वासना दृष्ट कामा नये रे ।

मना सर्वथा पापबुद्धी नको रे ।।

मना सर्वथा निती सोडू नको हो ।

मना अंतरी सार विचार राहो ।।४।।


मना पाप संकल्प सोडूनि द्यावा ।

मना सत्यसंकल्प जीवी धरावा ।।

मना कल्पना ते नको विषयांची ।

विकारे घडे हो जनी सर्व ची ची ।।५।


नको रे मना क्रोध हा खेदकारी ।

नको रे मना काम नाना विकारी ।।

नको रे मना सर्वदा अंगिकारू ।

नको रे मना मत्सरु दंभ भारु ।।६।।


मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे ।

मना बोलणे नीच सोशीत जावे ।।

स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे ।

मना सर्व लोकांसी रे निववावे ।।७।।


देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी ।

मना सज्जना हेचि क्रिया धरावी ।।

मना चंदनाचे परी त्वा झीजावे ।

परी अंतरी सज्जना निववावे ।।८।।


नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे ।

अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे ।।

घडे भोगणे पाप ते कर्म खोटे ।

न होता मनासारिखे दुःख मोठे ।।९।।


सदा सर्वदा प्रीती रामी धरावी ।

सुखाची स्वयें सांडी जीवी करावी ।।

देहे दुःख ते सुख मानीत जावे ।

विवेके सदा स्वरूपी भरावे ।।१०।।



।। जय जय रघुवीर समर्थ ।।

चौदावा अध्याय श्री सद्गुरू चरित्र

 ||श्री गणेशाय नमः|| ||श्री सरस्वतेय नमः|| ||श्री सद्गुरुभ्यो नमः|| नामधारक शिष्य देखा | विनवी सिद्धासी कवतुका | प्रश्न करी अति विशेखा | एक ...