।।श्री।।
।।श्री राम समर्थ।।
।।जय जय रघुवीर समर्थ।।
देहेबुद्धीचा निश्चयो ज्या टळेना ।
तया ज्ञान कल्पांतकाळी कळेना ।।
परब्रम्ह तें मीपणे आकळेना ।
मनी शून्य अज्ञान हे मावळेना ।।१९१।।
मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे ।
दुजेवीण तें ध्यान सर्वोत्तमाचे ।।
तया खूण ते हीन दृष्टांत पाहे ।
तेथे संग निसंग दोन्ही न साहे ।।१९२।।
नव्हे जाणता नेणता देवराणा ।
न ये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा ।।
नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा ।
श्रुती नेणती नेणती अंत त्याचा ।।१९३।।
वसे हृदयीं देव तो कोण कैसा ।
पुसे आदरे साधकु प्रश्न ऐसा ।
देहे टाकिता देव कोठें पाहतो ।
परि मागुता ठाव कोठे रहातो ।।१९४।।
वसे हृदयी देव तो जाण ऐसा ।
नाभाचेपरी व्यापकु जाण तैसा ।।
सदा संचाला येत ना जात काही ।
तयावीण कोठे रिता ठाव नाही ।।१९५।।
नभी वावरे जो अणुरेणू काही ।
रिता ठाव या राघवेवीण नाही ।।
तया पाहता पाहता तेचि झाले ।
तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले ।।१९६।।
नाभासारिखे रूप या राघवाचे ।
मनीं चिंतिता मूळ तुटे भवाचे ।।
तया पाहता देहबुद्धी उरेना ।
सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना ।।१९७।।
नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे ।
रघूनायका उपमा ते न साहे ।।
दुजेवीण जो तोचि तो हा स्वभावे ।
तया व्यापकु व्यर्थ कैसे म्हणावे ।।१९८।।
अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे ।
तेथे तर्क संपर्क तोही न साहे ।।
अति गूढ तें दृश्य तत्काळ सोपे ।
दुजेवीण जे खुण स्वामीप्रतापें ।।१९९।।
कळे आकळे रूप ते ज्ञान होता ।
तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था ।।
मनी उन्मनी शब्द कुंठित राहे ।
तो रे तोचि तो राम सर्वत्र पाहे ।।२००।।
कदा ओळखीमाजी दुजे दिसेना ।
मनी मानसी द्वैत काही वसेना ।।
बहुता दिसा आपली भेट जाली ।
विदेहीपणें सर्व काया निवाली ।।२०१।।
मना गुज रे तुज हे प्राप्त झाले ।
परी अंतरी पाहिजे यत्न केले ।।
सदा श्रवणें पाविजे निश्चयासी ।
धरी सज्जन संगती धन्य होसी ।।२०२।।
मना सर्वही संग सोडूनि द्यावा ।
अति आदरे सज्जनाचा धरावा ।।
जयाचेनि संगे महादुःख भंगे ।
जनीं साधनेवीण सन्मार्ग लागे ।।२०३।।
मना संग हा सर्व संगास तोडी ।
मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी ।।
मना संग हा साधना शीघ्र सोडी ।
मना संग हा द्वैत निःशेष मोडी ।।२०४।।
मनाची शते ऐकता दोष जाती ।
मती मंद ते साधना योग्य होती ।।
चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी ।
म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी ।।२०५।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा