|| श्री मनाचे श्लोक २१ ते ३० ||
मना वासना चुकवी येरझारा |
मना कामना सांडी रे द्रव्यदारा ||
मना यातना थोर हे गर्भवासी |
मना सज्जना भेटवी राघवासीं || २१ ||
मना सज्जना हीत माझे करावे ||
रघुनायका दृढ चित्ती धरावे ||
महाराज तो स्वामी वायू सुताचा |
जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा || २२ ||
न बोलें मना राघवेवीण कांही |
जनी वाउगें बोलता सुख नाहीं ||
घडीने घडी काळ आयुष्य नेतो |
देहांती तुला कोण सोडूं पाहतो || २३ ||
रघुनायकाविण वायां शिणावे |
जनासारिखे व्यर्थ कां वोसंणावें ||
सदा सर्वदा नाम वाचे वसो दे |
अहंता मनी पापीणी ते नसो दे || २४ ||
मना वीट मानू नको बोलण्याचा |
पुढे मागुता राम जोडेल कैंचा ||
सुखाची घडी लोटतां सूख आहे |
पुढे सर्व जाईल कांही न राहे || २५ ||
देहे रक्षणे कारणे यत्न केला |
परी शेवटी काळ घेऊन गेला ||
करी रे मना भक्ति या राघवाची |
पुढे अंतरी सोडी चिंता भवाची || २६ ||
भवाच्या भये काय भितोस लंडी |
धरी रे मना धीर धाकास सांडी ||
रघुनायका सारिखा स्वामी शिरी |
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी || २७ ||
दिनानाथ हा राम कोदंडधारी |
पुढे देखता काळ पोटी थरारी ||
मना वाक्य नेमस्त हे सत्य मानी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी || २८ ||
पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे |
बळे भक्तिरीपूशिरी कांबि वाजे ||
पुरी वाहिली सर्व जेने विमानी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी || २९ ||
समर्थाचिया सेवका वक्र पाहे |
असा सर्व भूमंडळी कोण आहे ||
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी || ३० ||
|| जय जय रघुविर समर्थ ||

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा