।। श्री ।।
।। श्रीराम समर्थ ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
।। श्री मनाचे श्लोक ३१ ते ४० ।।
|| जय जय रघुविर समर्थ ||
महासंकटी सोडिले देव जेणें |
प्रतापे बळे आगळा सर्वगुणे ||
जयाते स्मरे शैलेजा शूलपाणी |
नुपेक्षी कदा राम दासभिमानी || ३१ ||
अहिल्या शिळा राघवे मुक्त केली |
पदी लागता दिव्य होउनि गेली ||
जया वर्णिता शीणली वेदवाणी |
नुपेक्षी कदा राम दासभिमानी || ३२ ||
वसे मेरुमांदर हे सृष्टिलीला |
शशी सूर्य तरांगणे मेघमाळा ||
चिरंजीव केले जनी दास दोन्ही |
नुपेक्षी कदा राम दासभिमानी || ३३ ||
उपेक्षा कदा रामरुपी असेना |
जिवा मानवा निश्चयो तो वसेना ||
शिरी भार वाहेन बोले पुराणी |
नुपेक्षी कदा राम दासभिमानी || ३४ ||
असे हो जया अंतरी भाव जैसा |
वसे हो तया अंतरी देव तैसा ||
अनन्यासि रक्षितसे चापपाणी |
नुपेक्षी कदा राम दासभिमानी || ३५ ||
सदा सर्वदा देव सन्नीध आहे |
कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ||
सुखानंद आनंद कैवल्यदानी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी || ३६ ||
सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा |
उडी घालितो संकटी स्वामी तैसा ||
हरीभक्तीचा घाव गाजे निशाणी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी || ३७ ||
मना प्रार्थना तूजला एक आहे |
रघूराज थक्कीत होउनि पाहे |
अवज्ञा कदा हो यदर्थी न किजे |
मना सज्जना राघवी वस्ति कीजे || ३८ ||
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे |
जयाचेनि योगे समाधान बाणे ||
तयालागि हे सर्व चांचल्य दीजे |
मना सज्जना राघवी वस्ति कीजे || ३९ ||
मना पाविजे सर्वही सूख जेथे |
अती आदरे ठेविजे लक्ष तेथे ||
विवेके कुडी कल्पना पालटीजे |
मना सज्जना राघवी वस्ति कीजे || ४० ||
।। जय जय रघुविर समर्थ ।।
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा