अधिकमास माहात्म्य पोथी भाग ४ (७६ ते १११ ओव्या)

 

अधिकमास माहात्म्य पोथी (भाग )

 




पोपट तो पूर्वजन्मीचा | पुत्र असे शुकदेव तुमचा ||

संदेश दिला कल्याणाचा | लक्षात ठेवावा आपण ||७६||

 

ऐहिक सुखावर सोडून पाणी | साम्राज्य पदि पुत्रास बैसवूनी ||

दोघे गेले तपोवनी | अधिकमास व्रत करण्या ||७७||

 

त्यांच्या व्रताने होऊनी प्रसन्न | गोलोकात दिले स्थान ||

स्वतःस्वये नेले त्यांस | श्रीकृष्णाने ||७८||

 

पुराणकथा अनेक असती |  जे अधिकमास वृत्त आचारती ||

त्यांचे महात्म्य सांगतो मी | लक्ष देऊन ऐकावे ||७९||

 

आता ऐकावी दीपदानाची कथा |  त्याने दूर होती सर्व व्यथा ||

दानाचे कोणते पुण्य पदरी पडते |  ते आता सांगतो मी ||८०||

 

मणिग्रीव नामे व्यापारी श्रीमंत |  राहत होता चमत्कार नगरीत ||

भार्या  त्याची साध्वी  व सद्गुणी |  ती होती नामे सुंदरी ||८१||

 

धनसंपत्तीच्या जोरावर |  मणिग्रीव करीत असे अत्याचार ||

वाईट त्याची वर्तणूक |  नको नको ती कर्मे करीत ||८२||

 

छळाला त्याच्या लोक कंटाळले |  राजाने त्याची हाकलून लावले ||

गेले दोघे सोडून नगरी |  हाल  अपेष्टा आल्या पदरी ||८३||

 

पत्नी होती धीराची |  साध्वी आणि समाधानी ||

वारंवार करता उपदेश |  पश्चाताप झाला मणिग्रीवास ||८४||

 

उग्रदेव नामे तपस्वी |  जात होते प्रयाग तिरी ||

व्याकुळ होता तहान भुकेने |  मूर्च्छा येउनी भूवरी पडले ||८५||

 

या दोघांनी घरी आणूनी |  सेवा केली मनापासुनी ||

ऐकुनी त्यांची सारी व्यथा |  सांगितली पुरुषोत्तम वृत्तकथा ||८६||

 

अधिकमासात उभयतांनी |  अखंड दीप व्रत  आचरुनी  ||

प्रसन्न केले पुरुषोत्तमासी |  लावूनी नंदादीपा ||८७||

 

याच कारणे पुढील जन्मी | राजवैभव प्राप्त होऊनी ||

चंद्रकलेसह सुखी जाहले |  चित्रबाहू राजा ||८८||

 

आणि एक कथा ऐका |  कर्दम नामे ब्राह्मणाची एका ||

त्याची उजळली भाग्यरेखा |  पुरुशोत्तमाच्या व्रतामुळे ||८९||

 

एक होता महालोभी ब्राह्मण  |  नित्य करी असत्य भाषण ||

स्वार्थी मित्रद्रोही कृपण |  केवळ द्रव्य लोभापायी ||९०||

 

त्याच्या पापाचा घडा भरला |  शूद्र वानराचा जन्म लाभला ||

पुरुषोत्तम व्रताचा उपवास घडला |  कर्मधर्म संयोगाने ||९१||

 

जलाशयावर स्नान  घडले |  पुरुषोत्तम व्रत पूजन दिसले ||

अगणित पुण्य प्राप्त झाले |  गेला तो विष्णूलोकी ||९२||

 

अप्सरा स्मित विलासिनी |  दुर्वास ऋषींची थट्टा करुनी ||

त्यांच्या शापे पिशाच्च होऊनी |  भटकत राहिली रानोमाळी ||९३||

 

एक तपस्वी तिला भेटले |  अधिकमास व्रत करण्या सांगितले ||

त्या योगे पिषाचीनीला |  पुन्हा अप्सरा रूप प्राप्त झाले ||९४||

 

अधिक महिन्याच्या दोन पक्षी |  येतात दोन शुभ एकादशी ||

पहिलीचे नाम पद्मिनी |  दुसरी ती परमा असे||९५||

 

ज्यांना नसेल शक्य जाण |  पूर्ण महिन्याचे व्रताचरण ||

त्यांनी त्या दोन एकादशी |  पाळाव्यात किमान  पक्षी ||९६||

 

येता महिन्याचा शेवटचा दिवस |  श्रीकृष्ण पूजन करून खास ||

करावे अधिकमासाचे उद्यापण |  आपल्या शक्यतेने नुसार ||९७||

 

फापट  पसारा सर्व टाळावा |  उगीच डामडौल नसावा ||

मुख्य विधी फक्त आचरावा |  केवळ श्रद्धा असावी ||९८||

 

मूर्ती किंवा तसबीर मांडून |  यथासांग करावे पूजन ||

साष्टांग नमस्कार घालूनी |  प्रार्थना करावी मनोमनी ||९९||

 

देवा ही पूजा अंगीकारूनी |  अपराधांची क्षमा करूनी ||

अजाण बालक मज समजुनी |  कृपा करी मज  लागुनी ||१००||

 

शेवटी महानैवेद्य समर्पितावा  |  आधी गोग्रास वाढावा ||

मग जेवावे आपण |  प्रसन्न  चित्ते  ||१०१||

 

घास घेता मुखानी |  मौन पाळावे भोजनी ||

प्रत्येक घासा  सवे |  गोविंद गोविंद म्हणावे ||१०२||

 

वृत्ती सदा  उदार ठेवावी |  गोरगरिबांस भिक्षा द्यावी ||

अनाथ अपंगांची दया करावी |  सत्पात्री दान द्यावे ||१०३||

 

दोन ब्राह्मणांना बोलवावे |  विष्णू आणि कृष्ण त्यांना समजावे ||

दक्षिणा देऊन पूजा करावी |  एक  एक पोथी भेट द्यावी ||१०४||

 

अधिकमासाचे महत्त्व अपार |  पुरुषोत्तम व्रताचे पुण्य थोर ||

न करता ग्रंथ विस्तार |  संक्षेपे कथा सांगितल्या ||१०५||

  

हे व्रत करिता सुवासिनींनी |  सौभाग्य प्राप्त होईल त्यांना ||

व्रत करिता कुमारिकांनी |  भाग्यवंत पती मिळेल ||१०६||

 

लग्नार्थीयाचे व्हावे लग्न |  धनार्थीयाचे व्हावे धन ||

विद्यार्थ्यांना विद्या प्राप्ति |  मोक्षयार्थ्यांना मोक्षप्राप्ती होईल ||१०७||

 

अधिकमासात दैनंदिन |  पोथीचे करावे पारायण ||

श्रवण अथवा पठण करूनी |  पुण्य पदरी पडेल ||१०८||

 

श्रीविष्णूंनी नारदांना | श्रीकृष्णाने पांडवांना ||

सुतांनी सर्व ऋषीमुनींना |  पुरुषोत्तम व्रत सांगितले ||१०९||

 

महात्म्य थोर अधिकमासाचे |  खरोखर फलदायक असे ||

लहान  थोर गरीब  श्रीमंत |  सर्वांना सारखेच मिळते फळ ||११०||

 

अधिकमास हा पुण्य  पावन |  हरतील पापे कथा ऐकून ||

पुरुषोत्तम वरदहस्त लाभ |  सार्थक होईल जन्माचे ||१११||

 

||  इति  श्री अधिकमास महात्म्य संपूर्णम  ||

|| श्रीकृष्णपर्णमस्तु ||

||  शुभं भवतु ||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चौदावा अध्याय श्री सद्गुरू चरित्र

 ||श्री गणेशाय नमः|| ||श्री सरस्वतेय नमः|| ||श्री सद्गुरुभ्यो नमः|| नामधारक शिष्य देखा | विनवी सिद्धासी कवतुका | प्रश्न करी अति विशेखा | एक ...