।। श्री ।।
।। श्रीराम समर्थ ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
।। श्री मनाचे श्लोक ६१ ते ७० ।।
उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे ।
तया अंतरी सर्वदा तेचि राहे ।।
जनी सज्जनी वाद हा वाढवावा ।
पुढे मागुता शोक जीवी धरावा ।।६१।।
निजध्यास तो सर्व तूटोनि गेला ।
बळे अंतरी शोक संताप ठेला ।।
सुखानंद आनंद भेदे बुडाला ।
मनी निश्चयो सर्व खेदे उडाला ।।६२।।
घरी कामधेनू पुढे ताक मागे ।
हरीबोध सांडूनि वेवाद लागे ।।
करी सार चिंतामणी काचखंडे ।
तया मागता देत आहे उदंडे ।।६३।।
अती मूढ त्या दृढ बुध्दी असेना ।
अती काम त्या राम चित्ती वसेना ।।
अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा ।
अती विषयी सर्वदा दैन्यवाणा ।।६४।।
नको दैन्यवाणे जिणे भक्तीऊणे ।
अती मूर्ख त्या सर्वदा दुःख दूणे ।।
धरी रे मना आदरे प्रीति रामी ।
नको वासना हेमधामी विरामी ।।६५।।
नव्हे सार संसार हा घोर आहे ।
मना सज्जना सत्य शोधूनि पाहे ।।
जनी विष खाता पुढे सूख कैचे ।
करी रे मना ध्यान या राघवाचे ।।६६।।
घनश्याम हा राम लावन्यरूपी ।
महाधीर गंभीर पूर्णप्रतापी ।।
करी संकटी सेवकाचा कुढावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।। ६७ ।।
बळे आगळा राम कोदंडधारी ।
महा काळ विक्राळ तोही थरारी ।।
पुढे मानवा किंकरा कोण केवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।६८।।
सुखानंदकारी निवारी भयाते ।
जनी भक्तीभावे भजावे तयाते ।।
विवेकी त्यजावा अनाचार हेवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।६९।।
सदा रामनामे वदा पूर्णकामे ।
कदा बधिजेना पदा नित्यनेमे ।।
मदालस्य हा सर्व सोडुनि द्यावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।७०।।
।। जय जय रघुविर समर्थ ।।
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा