।। श्री ।।
।। श्रीराम समर्थ ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
।। श्री मनाचे श्लोक ५१ ते ६० ।।
मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी ।
प्रपंचीक नाही जयाते उपाधी ।।
सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ।। ५१ ।।
क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे ।
न लिंपे कदा दंभवादे विवादे ।।
करी सुखसंवाद जो ऊगमाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ।। ५२ ।।
सदा आर्जवी प्रिय जो सर्वलोकी ।
सदासर्वदा सत्यवादी विवेकी ।।
न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ।। ५३ ।।
सदा सेवि आरण्य तारुण्यकाळी ।
मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी ।।
चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ।। ५४ ।।
नसे मानसी नष्ट आशा दुराशा ।
वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा ।।
ऋणी देव हा भक्तीभावे जयाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोतमाचा ।। ५५ ।।
दिनाचा दयाळू मनाचा मवाळू ।
स्नेहाळू कृपाळू जनी दासपाळू ।।
तया अंतरी क्रोध संताप कैचा ।
जगी धन्य तो दास सर्वोतमाचा ।। ५६ ।।
जगी होईजे धन्य या रामनामे ।
क्रिया भक्ती उपासना नित्यनेमे ।।
उदासीनता तत्वता सार आहे ।
सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे ।। ५७ ।।
नको वासना विषयी वृत्तिरुपे ।
पदार्थी जडे कामना पूर्वपापे ।।
सदा राम निष्काम चिंतित जावा ।
मना कल्पनालेश तोही नसावा ।। ५८ ।।
मना कल्पना कल्पिता कल्पकोटी ।
नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी ।।
मनी कामना राम नाही जयाला ।
अती आदरे प्रीति नाही तयाला ।। ५९ ।।
मना राम कल्पतरू कामधेनू ।
निधी सार चिंतामणी काय वानू ।।
जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता ।
तया साम्यता कायसी कोण आता ।। ६० ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा