।। श्री ।।
।। श्रीराम समर्थ ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
बहु हिंडता सौख्य होणार नाही |
शिणावे परी नातुडे हीत काही ||
विचारे बरे अंतरा बोधवीजे |
मना सज्जना राघवी वस्ति कीजे || ४१ ||
बहुंतापरी हेचि आता धरावे |
रघूनायका आपुलेसे करावे ||
दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे |
मना सज्जना राघवी वस्ति कीजे || ४२ ||
मना सज्जना एक जीवी धरावे |
जनी आपुले हीत तूवा करावे ||
रघूनायकावीन बोलो नको हो |
सदा मानसी तो निजध्यास राहो || ४३ ||
मना रे जनी मौनमुद्रा धरावी |
कथा आदरे राघवाची करावी ||
नसे राम ते धाम सोडूनि द्यावे |
सुखलागि आरण्य सेवीत सजावें || ४४ ||
जयाचेनि संगे समाधान भंगे |
अहंता अकस्मात येऊनि लागे ||
तये संगतीची जनी कोण गोडी |
जिये संगतीने मती राम सोडी || ४५ ||
मना जे घडी राघवावीण गेली |
जनी आपुली ते तुवा हानी केली ||
रघूनायकावीण तो शीण आहे |
जनी दक्ष तो लक्ष लावूनि पाहे || ४६ ||
मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे |
जनी जाणता भक्त होउनि राहे ||
गुणी प्रीति राखे क्रमू साधनाचा |
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा || ४७ ||
सदा देवकाजी झिजे देह ज्याचा |
सदा रामनामे वदे नित्य वाचा ||
स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा |
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा || ४८ ||
सदा बोलण्यासारिखे चालताहे |
अनेकी सदा एक देवसि पाहे |
सगुणी भजे लेश नाहीं भ्रमाचा ||
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा || ४९ ||
नसे अंतरी काम नानाविकारी |
उदासीन जो तापसी ब्रह्मचारी ||
निवाला मनी लेश नाहीं तमाचा |
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचां || ५० ||
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा