।। श्री ।।
।। श्री राम समर्थ ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
खरे शोधीत शोधीत शोधताहे ।
मना बोधिता बोधिता बोधताहे ।।
परी सर्वही सज्जनाचेनि योगे ।
बरा निश्चयो पाविजे सानुरागें ।।१५१।।
बहुतांपरी कुसरी तत्त्वझाडा ।
परी अंतरी पाहिजे तो निवडा ।।
मना सार साचार ते वेगळे रे ।
समस्तांमध्ये एक ते आगळे रे ।।१५२।।
नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्त्वज्ञाने ।
समाधान काहीं नव्हे तानमाने ।।
नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें ।
समाधान ते सज्जनाचेनि योगे ।।१५३।।
महावाक्य तत्त्वादिके पंचकर्णे ।
खुणे पाविजे संतसंगे विवर्णे ।।
द्वितीयेसी संकेत जो दाविजेतो ।
तया सांडूनि चंद्रमा भाविजेतो ।।१५४।।
दिसेना जनीं तेचि शोधूनि पाहे ।
बरे पाहता गुज तेथेचि आहे ।।
करी घेऊ जाता कदा आढळेना ।
जनीं सर्व कोंदाटलें ते कळेना ।।१५५।।
म्हणे जाणता तो जनीं मूर्ख पाहे ।
अतर्कासि तर्की असा कोण आहे ।।
जनीं मीपणे पाहता पाहवेना ।
तया लक्षिता वेगळे राहवेना ।।१५६।।
बहू शस्त्र धुंडाळिता वाड आहे ।
जया निश्चयो एक तोही न साहे ।।
मती भांडती शास्त्रबोधे विरोधें ।
गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे ।।१५७।।
श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे ।
स्मृती वेद वेदांतवाक्ये विचित्रे ।।
स्वये शेष मौनावाला स्थिर पाहे ।
मना सर्व जाणीव सांडूनि राहे ।।१५८।।
जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची ।
तया भोजनाची रुची प्राप्त कैची ।।
अहंभाव ज्या मानसीचा विरेना ।
तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना ।।१५९।।
नको रे मना वाद हा खेदकारी ।
नको रे मना भेद नानाविकारी ।।
नको रे मना शिकवूं पुढिलांसी ।
अहंभाव जो राहिला तुजपासीं ।।१६०।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा